
कसा कुणास ठाऊक, पण मला माझ्या शाळेतला पहिला दिवस अजूनही अगदी तस्साच्या तसा आठवतो. मला शाळेत सोडून, शाळेशेजारीच आमचे "फॅमिली फ्रेंड' राहायचे तिकडे आईने थांबायचं ठरवलं होतं. मी अक्कल लढवून "बाई बाथरूमला जायचंय' असं खूप केविलवाण्या स्वरात सांगून खाली गेले आणि आई जिथे आहे त्या दिशेने डोळे खिळवून जोरदार भोकाड पसरलं! हा क्रम जवळजवळ एक आठवडा चालला, मग हळूहळू सगळ्यांशी गट्टी जमली आणि मी रमून गेले माझ्या विश्वात.
खूप गोड आठवणी आहेत माझ्या शाळेच्या. हृदयाचा हा कप्पा जेव्हा मी उघडते तेव्हा डोळे आपोआप किरमिजे होतात आणि गालावर हसू उमटतं. हो प्रियकराची एखादी गोड आठवण स्मरली की होतं ना तसंच!
लहानपणापासून मी महावात्रट होते. हा गुण नक्कीच बाबांकडून घेतलेला आहे मी. जवळजवळ आठवड्यातले तीन दिवस मुख्याध्यापिकांच्या ऑफिसमध्ये अंगठे धरून उभी (!) असायचे. खरं सांगू का मला ना दोन मुली खूप छळायच्या, दंगा स्वतः करून नाव माझ्यावर घ्यायच्या आणि मग आम्ही तिघीही अंगठे धरून केबिनमध्ये... आज त्या दोघीही माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि सुखाने नांदतायत.
शाळेत असताना एक सर किंवा बाई असतात, ज्या आपल्याला देवासमान वाटतात. माझ्यासाठी माझं दैवत होतं ते कनप सर. अतिशय शिस्तबद्ध, हुशार आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व. मी पाचवीत गेले तेव्हा सर शाळा सोडून गेले. माझ्या जगातले जणू रंगच हरवून गेले. ढसाढसा रडण्यात एक आठवडा घालवला. आजतागायत आमची भेट नाही. आज मी जे काही काम करतेय ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं... अशी माझी कळकळीची प्रार्थना.
आमची बॅच सगळ्यात दंगेखोर बॅच म्हणून प्रसिद्ध होती आणि या राक्षसी बॅचवर फुलांचा वर्षाव करायचे आमचे सी.बी.के. सर. सरांच्या गालावर चोवीस तास हसू असायचं आणि ते वर्गात आले, की आम्ही दंगेखोर नग कसे काय शांत व्हायचो, आणि आमच्याही गाली कसं काय हसू यायचं ते परमेश्वराला ठाऊक. सर, मी प्रत्येक नवीन प्रोजेक्ट स्वीकारताना तुमच्या पाया पडते... तुम्ही आज असता तर तुमच्या खास शैलीमध्ये "अरे वा !' असा शेरा मारला असता. तो ऐकायला कान कायमचे मुकले... पण तुम्हाला वंदन केल्याविना माझ्या काळजाला उसंत येत नाही.
शाळा मला जीवापाड प्रिय... आमचे सगळे वॉचमन काका, मावशी, ते ग्राऊंड... ती झाडं... ते वर्ग, पेनाने गिरवून काळीनिळी झालेली बाकडी या गोष्टी मला डोळे बंद करता क्षणी दिसतात. मी जी काही घडले ती शाळेत.
आज मी रुबाबात इंग्रजी फेकत असेन तर ते माझ्या गोखले सर आणि अभ्यंकरबाईंमुळे. कोणत्या प्रसंगी काय कपडे घालायचे याचं भान कुसगांवकरबाईंमुळे, झाडांविषयी प्रेमा जोशीबाईंमुळे, अपार कष्ट करण्याची हिंमत पाटीलबाईंनी दिली... शिस्तीला आपला मित्र बनवलं ते एस.एस.के. सरांमुळे, प्रत्येक क्षण जगायला शिकवलं साखरे सरांनी.
लेखणी मला परत शाळेत घेऊन गेली असती तर किती मजा आली असती. पण एक गोष्ट अगदी मनापासून सांगते. माझ्या हृदयातला हा शाळेचा कप्पा मी वारंवार उघडते. खूप बरं वाटतं. फुलपाखरू होऊन बागडल्यासारखं वाटतं.
No comments:
Post a Comment