
त्यानंतर भेटलो ते नूतन गंधर्व यांना. बालगंधर्वांच्या काही पदांची सीडी त्यांच्याकडे होती, ती घेऊन सांगलीला गेलो. तिकडे चितळेंना भेटलो, त्यांच्याकडे बालगंधर्वांवरचं खूप साहित्य मिळालं. त्याबरोबर बालगंधर्वांच्या स्त्री वेषातील सादरीकरणाचा व्हिडीओ होता. बालगंधर्वांनी जी मीरेची भूमिका केली होती, त्याचं पाच ते दहा मिनिटांचं चित्रीकरण होतं ते. ते बघताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आत्तापर्यंत त्यांना फोटो, वाचन आणि व्ही. शांताराम यांच्याबरोबरचा "धर्मात्मा' चित्रपट यातून पाहिलं होतं. पण, नाटकाचं चित्रीकरण कुठेच उपलब्ध नव्हतं ते मिळालं. त्याचं गाणं, ती वेषभूषा सादरीकरण हे व्हिडीओवर पाहून मी भारावलो. तर ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असेल त्यांची काय अवस्था झाली असेल. त्या मंडळींचा मला हेवा वाटतो.
या मिळालेल्या गोष्टींबद्दल माझं आणि नितीनचं लगेच फोनवरुन बोलणं व्हायचं. नितीनही त्याला मुंबईत काही मिळालं की लगेच सांगायचा. हे एवढं सगळं मिळतंय हे बघून मला असं वाटलं, खुद्द बालगंधर्वांचीच अशी इच्छा असावी की माझ्यावर काहीतरी निर्माण व्हावं. सुरुवात चांगली झाली होती, पुढचं चित्रही आशादायक होती. त्यानंतर मग पुण्यात कीर्ती शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांना भेटलो. त्यांनी बालगंधर्वांच्या नाटकाबद्दल बरंच काही जपून ठेवलं होतं. मग शैला दातार ज्या बखले बुवांच्या कुटुंबातील आहेत, त्यांनीही खूप मदत केली. बालगंधर्वांनी लिहिलेलं दुर्मिळ हस्तलिखित जे आत्तापर्यंत प्रकाशित झालं नाही, ते वाचायला दिलं. त्यानंतर हरीभाऊ देशपांडे, जे बालगंधर्वांच्या नाट्य मंडळाच्या वाद्यवृंदात होते. त्यांच्या घरी गेलो. हरीभाऊंच्या नातवाने त्याकाळी काय ऑर्गन वाजवत जात होते ते दाखवलं.
त्यांच्याकडून आम्ही गेलो ते लक्ष्मीचंद नारंग यांच्या घरी. जे बालगंधर्वांचे मोठे चाहते होते. त्यावेळी एक योगायोग असा घडला. आषाढी एकादशीचा दिवस होता. त्यादिवशी आम्ही एन. डी. स्टुडिओत "बालगंधर्व'चा मुहूर्त केला होता. त्याच दिवशी नारंग यांच्या घरी गेलो. तिथे आम्हाला बालगंधर्वांनी "कान्होपात्रा'मध्ये स्वतः घडवलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीचं आम्हाला दर्शन झालं. त्याचबरोबर बालगंधर्व ज्या गणपतीची पूजा करत होते, ती मूर्तीही आम्हाला मिळाली. आमच्यासाठी तो भाग्याचा दिवस होता. बालगंधर्वांचा आशिर्वाद आमच्याबरोबर होता, म्हणूनच हा दिवस आम्हाला मिळाला.
त्याचबरोबर काही जुने रेकॉर्डस्ही आम्हाला बघायला मिळाल्या. त्याबरोबर एक रेकॉर्डिंग मशिनही त्यांच्याकडे होतं. जे त्यावेळी नारंग यांनी बालगंधर्वांसाठी आणलं होतं. 1920 मध्ये तब्बल पाच हजार अमेरिकन डॉलर्स खर्च करून. नारंग यांना बालगंधर्वांबद्दल बखलेबुवांकडून कळलं. तेव्हा त्यांनी बालगंधर्वांना ऐकलं, तेव्हापासून ते त्यांचे चाहते झाले. त्यावेळी नारंग बालगंधर्वांना खास नाटकासाठी कराचीला घेऊन जायचे. तिथे त्यांची मोठी हवेली होती. दरवेळेस ते बालगंधर्वांची बडदास्त ठेवायचे. नारंग हे कराचीतील फार मोठे व्यापारी होते.
ही सगळी माहिती मिळाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडूनही आम्हाला खूप मदत झाली. त्यांचे वडिल हे गंधर्व नाट्यमंडळात पडदे रंगवायचं काम करायचे, ही माहिती आम्हाला मिळत गेली, हे आमचं भाग्यच होतं. आमच्या कामाला अधिकच जोर आला. अनेक लोकांच्या पाठिंब्याने आणि मदतीने आमचं काम जोरात सुरू झालं. या आमच्या कामात ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांना शतशः धन्यवाद.Kindle Wireless Reading Device, Wi-Fi, Graphite, 6" Display with New E Ink Pearl Technology
No comments:
Post a Comment