Friday, 1 April 2011

कुछ तो लोग कहेंगे...(मृण्मयी देशपांडे)

"का य बाबा, मृण्मयी आता मोठी झाली,... तिला नक्की घेऊन या हं आमच्याकडे... अगदी एका रात्रीत स्टार झाली हो... ती फोन करत नाही, केला तर उचलत नाही, भेटत नाही...'

आमच्या घरात पाहुणे आले होते आणि त्यांची माझ्याबद्दल ही सगळी बोलणी चालली होती. मी आतल्या खोलीत माझं काम करत होते... ही सगळी वाक्‍यं माझ्या कानावर पडत होती... बाहेर बिचारे माझे आई-बाबा त्यांच्या सगळ्या प्रश्‍नांना समंजसपणे उत्तरं देत होते. (काही खोचक प्रश्‍नसुद्धा होते. त्यांना पण जमेल तेवढ्या विनम्रपणे उत्तर देत होते.) दोन तास झाले तरी त्यांचं मृण्मयी पुराण संपत नव्हतं आणि ही पाहुणे मंडळीही जायचंही नाव काढत नव्हती. मी बारीक वैतागले होते (खरं म्हणजे बारीक नाही तर खूप खूप वैतागले होते, कारण मला असं कळलं होतं, की हे नातेवाईक खरं तर नातेवाईकपण नव्हते... आजी-आजोबा पूर्वी जिथे राहायचे, त्याच्या शेजारी राहणाऱ्या जोडप्याची ही मुलं होती. कसं काय आमचा पत्ता शोधत आली माहित नाही.) शेवटी आजीच म्हणाली, "आत्ता आम्हाला बाहेर जायचंय, जरा आवरायला पाहिजे,' तेव्हा कुठे ते निघाले. जाताना माझ्याकडे त्यांच्या मुलाचे पाच-सहा फोटो दिले आणि म्हणाले, "आत्ता याला सिरियलमध्ये काम देण्याचं काम तुझं.'

त्या मुलाला धड दोन वाक्‍यंसुद्धा बोलता येत नव्हती. मराठी असूनसुद्धा मराठीची बोंब होती. त्यांनी फोटो दिल्यावर माझ्या लक्षात आलं, की अच्छा हे काम होतं, म्हणून यांना मला भेटायचं होतं काय? (त्या दिवसानंतर ते मला दिवसातून तीन ते चार फोन करतात आणि काही झालं का म्हणून विचारतात. मी माझ्या परीने प्रयत्न पण केले, पण...) मी तोवर वैतागले होते. एकमेव हक्काच्या सुट्टीतले दोन तास वाया गेले होते आणि राहून राहून मी ते जे काही बोलत होते त्याचा विचार करत होते.

"मृण्मयी आता मोठी झाली, ती आता ओळख देत नाही.' मला वाटलं, वा, वा... यांना आज अचानक कळलंय की मी मोठी झालीय? जणू काही गेली बावीस वर्ष मी वीतभरच होते? आणि हो, मी त्यांना ओळख दिली नव्हती... कशी देणार ओळख ? माझी आजी-आजोबांच्या काळातली माणसं ही... स्वप्नातसुद्धा न भेटणारी. त्यांना ओळखायला मी काय ब्रह्मदेव लागून गेलीय ?
आमचे फोन उचलत नाही... अरे ??? दिवसातून वीस तास आम्ही खरोखरंच मान मोडून काम करत असतो... कसे उचलणार यांचे फोन आणि या सगळ्याचा शेवट काय होतो ? मृण्मयी आता पूर्वीसारखी नाही राहिली. देवा देवा, मी पार कंटाळून गेलीय या वाक्‍यांना... आणि मजा माहितीय,... हे सगळे बोलणारे कोण असतात? जे खरंच माझ्या ओळखीचे नसतात. माझ्याच काय, तर आई-बाबांच्यापण ओळखीचे नसतात.
कसं असतं ना जग... देखल्या देवा दंडवत. नशीबाने माझ्या सगळ्या नातेवाईकांमध्ये कोणी तसं नाही. आईकडचे, बाबांकडचे सगळेच जण अत्यंत समजूतदार आहेत. कारण माझ्या लहानपणापासून ते माझ्या जवळ आहेत. माझ्या प्रत्येक सुख-दुःखात ते सामील आहेत आणि ते पण मृण्मयी एक सेलिब्रिटी आहे म्हणून नाही तर ती सामान्य चारचौघींसारखी मुलगी आहे म्हणून. किंवा खरं सांगू का, मी घरात असताना माझ्या कुठल्याही कामाचा विषय ते कधीच काढत नाहीत. कारण माझी चिडचिड होते. खरं म्हणजे प्रश्‍न हे सगळं बोलल्यामुळे त्रास होतो हा नाहिये. त्रास कोण बोलतंय याचा होतो.

मला खूप लोक भेटतात. रस्त्यावरती... कधी घरात येऊनही कौतुक करतात, हक्कानं कधी मुंबईच्या घरीही येतात. माझ्या मैत्रिणीची नात म्हणजे माझीच नात असं म्हणतात आणि ते सगळं मला आवडतंच. त्यांच्या डोळ्यातलं कौतुक... प्रेम. मग ते ओळखीचं असो की अनोळखी... सुखावून जातंच. काम करायला नवी उभारी देतं.

पण काही माणंसांबद्दल नाही असं होत. आपल्या आयुष्यात अनेक जणांचे चांगले-वाईट अनुभव आपल्याला आलेले असतात. आपल्या चांगल्या वेळात मदत करणारे लक्षात रहातातच, पण आपल्या वाईट वेळात मदत करणारे जास्त लक्षात रहातात आणि आपल्या वाईट वेळात साथ सोडून जाणारे किंवा आपल्या कुटुंबाच्या वाईट वेळात तोंड फिरवणारेही लक्षात रहातात... असे लोक जेव्हा थोडीफार प्रसिद्धी मिळाली की परत येतात... तोंडभरून कौतुक करतात... आम्हाला लक्षात ठेव हं म्हणून तोंडभर सांगतात. तेव्हा तुम्हीच सांगा राव, चिडचिड होणारच ना ?
मी कायम हा विचार करते... मी जर ऍक्‍ट्रेस नसते तर ?... तर माझ्यावर त्याच लोकांनी (जे माझ्या गरजेच्या काळात माझ्या मदतीला नव्हते) तेवढंच प्रेम केलं असतं ? कदाचित नाही. ...आणि हे अनुभव तर फक्त मलाच येतायत असं नाही. तर प्रत्येकालाच या ना त्या रुपाने अशी माणसं भेटली असणार. त्यांच्या सुखात सामील होऊन दुःखात पळून गेली असणार. ती बोच प्रत्येकाच्या मनात कुठेतरी सलत असणार. पण मला वाटतं बरेच असे अनुभवपण येतात. कारण त्यातच आपली माणसं कळतात.

मी परत परत सांगते, मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. आपल्या भेटण्याचा हिला कंटाळा आलाय, आता हिला लोकांचा त्रास व्हायला लागलाय... असं मुळीच काही नाहीये. मी तुमच्या किंवा कुणाच्या निखळ प्रेमाबद्दल बोलत नाहिये. मी बोलतेय ते फक्त स्वतःचा फायदा पाहूनच वावरणाऱ्या लोकांबद्दल... जी मैत्री करतात ती पण फायद्यासाठी आणि तोडतात ती पण फायद्यासाठी. कधी कधी वाटतं अशा लोकांचं काय करायचं ? आणि लगेचच उत्तरही मिळतं... काही नाही. त्यांच्याही बरोबर थोडा वेळ थांबायचं, थोडं हसायचं, खेळायचं आणि पुढं पुढं जायचं... कारणं अशी माणसं भेटतच रहाणार. पण त्यांना टाळून आणि ओळखून पुढे जाणं हेच खरं शहाणपणाचं ठरणार...

आता मला विचाराल, हे सगळं आज अचानक आमच्यासाठी का बोलतेयस? तर मला तुम्हीच सांगा, हे सगळं मी तुमच्यापाशी नाही तर कुणापाशी बोलणार? 

No comments:

Post a Comment